Friday, February 5, 2010

श्लोक ६

II श्रीराम समर्थ II
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
जय जय रघुवीर समर्थ !
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे मनाच्या श्लोकांवरिल श्राव्य निरूपण

10 comments:

Kalyan Swami said...

या श्लोकाबरोबर डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे 'दैनंदिन मनाचे श्लोक' यातील याच श्लोकावरचे फक्त ५ मिनिटांचे निरुपण ऐकता येईल.
दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्रीराम समर्थ||
रिपू
समर्थांनी षड्-रिपूचे विवेचन आता सुरु केले आहे, भक्ती मार्गावरून चालताना या भौतिक जगाचा तर त्याग करता येणार नाही , तसेच रोजचे व्यवहार देखील थांबवता येणार नाहीत हे समर्थ जाणतात ....
पण या जगात वावरत असताना काही गोष्टींपासून दूर नक्की राहता येते याची पण समर्थ जाणीव करून देतात. ...
सुखी समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे मना, या विकारांपासून तू दूर राहा, ..कारण हे विकार आत्मनाशाचे बीज आहे ...
हे विकार असुरी संपत्तीचे गुण आहेत.सामान्यपणे मनाची अवस्था वर्णन करताना समर्थ म्हणतात...
काम-मगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना|
मद मत्सर वोहटेना | भुली पडली || दास ३.१०. ४ ||
हे सर्ब विकार आणि वासना माणसाला सतत असमाधानी, अस्वस्थ , अस्थिर ठेवते ...
जीवाला सतत भीती आणि चिंता करायला लावून मनस्ताप देत रहाते. ....या सर्वातून जर सुटायचे असेल तर हे मना या विकारांचा त्याग कर!

जय जय रघुवीर समर्थ !

Gandhali said...

मना ! तुझ्या योगानेच इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याला श्रेष्ठात्व आले आहे.मनन करणारा प्राणी तो मनुष्य !
मन हे ओढाळ आहे जिकडे धावेल तिकडे धावेल पण त्याला न्यावे तिकडे ही ते जाते हा त्याचा उत्तम गुण लक्षात घेउन समर्थानी त्याला उपदेश केला आहे.
त्याला विषयाची गोडी न चाखविता विषयदोष - दर्शन घडविले तर तेच मन विषयांचा कंटाळा करुन आत्मरामी रंगते. समर्थ वरील श्लोकत सांगतात की,
हे मना ! हा दु:ख देणारा क्रोध, नानाविकारी काम , मद , मत्सर, दंभ यापासून पूर्णपणे दूर रहा . हे सहा विकार आसुरी संपत्तीचे, अज्ञानाचे आहेत, त्याना जिंकले पाहिजे.
दंभ , दर्प ,अभिमान ! क्रोध आणि कठीण वचन !
हे अज्ञानाचे लक्षण ! भगवद गीतेत बोलिले !!
या सहा विकारांच्या तालावर मन नाचू लागले तर अनर्थ होतो. महाभारत, रामायण या क्रोध, मोह,मत्सरा मुळेच घडले.
.आजही सकाळी वृत्तपत्र उघडले तर चोरी, लूट, अपघात, बलात्कार, आत्महत्या , राजकारणातील वातावरण , दशहतावाद याचे कारण वरील विकारच.
अगदी आसपास घर,ऑफिस मध्ये होणारे कलह, ताण - तणाव पाहिले तर सगळ्याचे मूळ काम ,क्रोध,लोभ.मद,मत्सर,मोह या विकारामधेच दिसते.
एखादी वस्तु,पद,मान पहिली की मला ही हवे असे वाटणे म्हणजे काम .....! न मिळेल तर क्रोध ....! मिळाली तर टिकावी आणि अजून मिळावी हा मोह .....! आपल्या जवळ आहे इतरांकडे नाही असा डौल म्हणजे मद .....! आपणापासून हिरावेल ही भीती .....!
अणि तसेच किंवा अधिक इतरांकडे आहे कळल्यावर चैन न पडणे हा मत्सर .....!
या सर्वांवर आत्मनिश्चय करुन विजय मिळवला म्हणजे सर्व अध:पतन टळेल.
जसा ग्रहणाच्या वेळी सूर्य झाकला जातो अन सगळीकडे अंधार पसरू लागतो, त्याप्रमाणे या विकारांच्यामुळे आत्मनिश्चय,आत्मज्ञान मलीन होउन अज्ञानाचा अंधार पसरतो.
हे टाळण्यासाठी समर्थ सांगतात " नको रे मना ............

" जय जय रघुवीर समर्थ "

Dr.Madhavi Mahajan said...

//श्रीराम समर्थ//

उत्तमपुरुष निरुपण समासामध्ये समर्थांनी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत...पुढे अठराव्या दशकातील सहाव्या समासात तोंडाळ, कठोरवचनी, शीघ्रकोपी, माणसाला समर्थांनी राक्षस म्हणून संबोधिले ....
या सर्व विकारामध्ये क्रोध हा माणसाचा प्रधान शत्रू आहे ...हा क्रोध कसा बळावतो?
समर्थ म्हणतात,
अभिमाने उठे मत्सर | मत्सरे ये तिरस्कार |
पुढे क्रोधाचा विकार | प्रबळे बळे ||दास १.१.२३||
विचारशक्ती नष्ट करणारा, स्वत: बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्याची शिकवण समर्थ सांगतात.....कारण या क्रोधाचे अनेक दुष्परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवर होतात. ....भगवदगीतेत भगवंतानी स्पष्ट सांगितले आहे,
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः |
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||अध्याय २ श्लोक ६३ ||
क्रोधामुळे भ्रम होतो , भ्रमामुळे तसेच अविवेकामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धि नष्ट होते आणि बुद्धिनाश झाला, विवेकाचा नाश झाला कि सर्वस्वाचा नाश होतो ! ..

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम||

काम, क्रोध आणि लोभ हे तीन दोष म्हणजे नरकाची तीन द्वारे आहेत आणि आत्म्याचा नाश करणारी आहेत.म्हणून त्याचा त्याग करावा असे मार्गदर्शन भगवंताने गीते मध्ये केले आहे,
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः |
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् || गीता१६.२१||
आजच्या २१ व्या शतकात मानवाने आपले जीवन सुखी करण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते .. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुख कसे प्राप्त करून घेता येईल यादृष्टीने तो सतत प्रयत्नशील राहतो ...
या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते..
या भोगवादी जगात यांत्रिक विकासाला जेवढे प्राधान्य दिले जाते तेवढेच मानसिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यातूनच एकमेकांविषयी राग, द्वेष,हेवेदावे-मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास होताना दिसतो...
या विकारांच्या प्रभावाने त्रिदोषांचा असुर मानवी मनामध्ये सतत थैमान घालत असतो .....
काम क्रोधे लिथाडला| तो कैसा म्हणावा भला ||दास.१.१.२५||
कामक्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही, असे समर्थ म्हणतात...

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम ||

काम आणि क्रोध अत्यंत घातक असे हे दोन विकार मनावर साम्राज्य गाजवतात...
जेथे काम तेथे क्रोध स्वाभाविक पणे येतोच. ...मानवी मनामध्ये विषयतृप्तीच्या दृष्टीने जे विचार येतात ते म्हणजे इच्छा -कामना, मग ती कोणत्याही इंद्रियाची तृप्ती करण्याविषयी असो, आणि ही तृप्ती प्राप्त करून घेण्यासाठी धावणारा जीव कितीही मिळाले तरी सतत अतृप्तच असतो ...
या विकारातूनच मग समाजामध्ये अनेक पाशवी घटना घडताना आपण पाहत असतो, ना भय ना लाज यामुळे अनाथालयाची वाढ, एडस सारख्या रोगांची वाढ , एकतर्फी प्रेमातून होणारे खून, अशा प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात, हे समाजाचे होणारे प्रदूषण आहे ....
अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा !
विषयांच्या मागे धावणाऱ्या जीवाची अवस्था दीनवाणीच होते ....
'नको काम हा क्रोध चांडाळ पापी' असे समर्थ म्हणतात तर माउली म्हणतात 'पार्थ दोन्ही कामक्रोध हे घातकू जाण! |'
आपल्या मनाचा ताबा घेणाऱ्या या विकारांना आपल्या स्व:ताविषयी मात्र दया उत्पन्न होत नाही ..रजोगुणापासून निर्माण होणार्या या दोषांपासून सर्वथा दूर राहणेच योग्य ! असे समर्थ सांगतात.......

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम ||

काम-क्रोधाप्रमाणेच विखारी आहे तो लोभ ! कामाची प्राप्ती झाल्यावर किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर सतत त्याच तृप्तीचा आनंद लुटावा ही लालसा मानवी मनामध्ये निर्माण होते, पण कितीही त्या विषयाचा आनंद घेतला तरी लालसा कमीच होत नाही..
तृप्ती न होणे हा लोभाचा स्वभाव आहे, लोभ हा गरजेपोटी नसतो तर वासानेपोटी असतो. स्त्रीलोभा इतकीच धनाची वासना तीव्र असते ..पैसा कितीही मिळवला तरी तो कमीच पडतो ...कितीही पैसा मिळवला तरी माणसाच्या गरजा त्या पैश्यामधून भागत नाहीतच म्हणून तो अधिकाधिक धनप्राप्ती करून घेण्याच्या मागे लागतो ...या धावपळीत आपल्या कुटुंबापासून आपण दूर जात आहोत हे त्याच्या लक्षात देखील येत नाही ...
सततच वाढत जाणार्या गरजा आणि त्याच्या पूर्तीसाठी धनप्राप्ती या चक्रातून त्याची कधीच सुटका होत नाही कारण गरजांना अंतच नसतो ...
अन्न, वस्त्र , निवारा या तीन प्रमुख गरजा भागल्या तरी भोगवादाच्या आहारी गेलेल्या माणसाचा लोभ सुटत नाही ..गरज नसताना नवीन वस्तू घरात येतच राहतात पण त्याच बरोबर जुन्या वस्तूंचा मोह देखील सुटत नाही...जुन्या वस्तूमध्ये भावना गुंतल्यामुळे आणि नव्याचा हव्यास ना सुटल्यामुळे !
या लोभाचा आणि मोहाचा गुंता काही केल्या सुटत नाही सर्व काही प्राप्त करून माणसाला सतत अपुरेपणाची जाणीव होत रहाते.त्यामुळे तो सतत अशांत आणि असमाधानीच राहतो ...लोभाला मर्यादा नाही ...सतत अतृप्त ठेवणारा लोभ माणसाच्या दु:खाला कारणीभूत ठरतो ...सतत प्रपंचाचे तसेच मी, माझे याचेच चिंतन केल्याने आपल्या मनात लोभाचे कायमचे बस्तान बसते ... आणि मग हा लोभ मनात क्षोभ निर्माण करतो ..
पुरेना मनी लोभ रे क्षोभ त्याते | म्हणोनी जन मागुता जन्म घेते ||

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम समर्थ ||
दंभ हा मानवी मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे सर्व दुर्गुणांचा राजा दंभ आहे म्हणूनच भगवदगीतेत असुरी संपत्तीचे वर्णन करताना दंभ या दुर्गुणाला सर्व दुर्गुणामध्ये मानाचे स्थान दिले आहे

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च |
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् || ४||

दंभाला इंग्रजी मध्ये 'hypocrisy' म्हणतात .....
याचा अर्थ नाटकीपणा, देखावा, बाह्य-डामडौल,ढोंग, क्रोध , कठोरपणा आणि अज्ञान !ही सर्व असुरी प्रवृत्ती आहे .... समर्थांना सर्वात जास्त चीड या दुर्गुणाची आहे... समर्थ आपल्या महंतांना उत्तम महंत होण्यासाठी महंत व्हा पण महंती करू नका असे बजावतात ...महंती म्हणजे महंतपणाचा डामडौल /दिमाख ..या दिमाखा बरोबर दंभ आलाच म्हणून समर्थांना महान्तीचा तिटकारा आहे दंभ नसेल तरच मनातील विचार आणि आचार यांचा मेळ जमेल ...विकारांवर विजय मिळवला तरच मन:शांती लाभेल यासाठी समर्थ मनाला विकारांचा त्याग करायला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ !

Kalyan Swami said...

As Stated by Lochan Kate ( Gwaliar)..श्लोक ६...
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! क्रोध ना करो| क्रोध करने से अंत मे पश्चाताप करना पडता है| नाना प्रकार के विकार पैदा करने वाले कार्य कभी भी नही करना चाहिए| अपने मन मे लोभ पैदा नही करना चाहिए| अपने ,मे अहंकार एवं द्वेष की भावना कभी भी नही रखना चाहिए,वरना् हम अपना ही नाश कर लेते है| लोभी मानव के लिए यह कार्य विकार पैदा करता है| अत: अहंकार एवं द्वेष से सदैव दूर रहना चाहिए| वरना अंत मे पछताना पडता है|.

lochan kate said...

श्लोक ६............
क्रोध तु ना कर जो होता है खेदकारी |
मन की कामना होती तब नाना विकारी||
अंगीकार ना कर लोभ कातु रे|
मन,मत्सर दंभ से भर ना तु रे|