Friday, May 28, 2010

श्लोक २२

II श्रीराम समर्थ II

मना सज्जना हीत माझें करावें |
रघुनायका दृढ़ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |
जना उद्धरी  नाथ  लोकत्रयाचा ||२२||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

8 comments:

Suhas said...

II श्रीराम समर्थ II
श्लोक २२
श्री समर्थ मनाला सांगताहेत .. रे मना, रे सज्जना, स्वत:चे हीत कर, फायदा कर की रघुनाथाला, रघुकुलाच्या स्वामीला घट्ट धरून ठेव !
त्यातच कल्याण आहे .. उठता- बसता, चालता - बोलता, खाता- पिता, एव्हढेच नव्हे तर निद्रेत देखील रामाचाच ध्यास घे! रामालाच आपलेसे कर कारण ज्या हनुमंताने लंका जाळली, आणि राक्षसाना धडा शिकवला असा जितेंद्रिय, मनोवेगे उड्डाण करणारा, बुद्धिमान , वानरांचा प्रमुख असा शक्तिशाली पवनसुत- हनुमंताचा " श्रीराम " हा स्वामी आहे ! अशा महाबली हनुमंताने श्रीरामाला दृढ चित्ती ठेवले आहे .. एका रामाशिवाय त्याला दुसरे ध्यान नाही ! आणि हनुमंताबरोबरच अवघे जग... त्याचाही तोच नाथ आहे .. तिन्ही लोकांचा तो नाथ आहे .. तो तिन्ही लोक . स्वर्ग , मृत्युलोक , पाताळ यांचा प्रतिपाळ करतो .. सर्वत्र त्याचीच सत्ता चालते अशा श्रीरामाचे तू देखील ध्यान करावेस, असा परम शक्तिशाली श्रीराम तुझे कल्याण करील..
श्री समर्थांना लोक कल्याणाची अत्यंतिक तळमळ होती .. त्या तळमळीपोटी अनेकानेक उदाहरणे सांगून समर्थ मनाला भक्तिमार्गाची वाट दाखवत आहेत .. परोपरीने समजावत आहेत .. लोक कल्याणाची अशी तळमळ त्यांच्या पोटी होती म्हणूनच ते लोकोत्तर कार्य करू शकले.. त्यांच्या साहित्यात त्याचा पदोपदी प्रत्यय येतो.. मनाच्या श्लोकांसारख्या छोटेखानी लेखनात सुद्धा भक्तिमार्गावर अनेक श्लोक लिहिले आहेत .. दासबोधातील नवविधा भक्तीचे दशक ( दशक ४ ) इथे पूर्णाशाने आले आहे. नामस्मरण भक्ती सांगताना ते म्हणतात ..
काहीच न करुनी प्राणी | रामनाम जपे वाणी ||
तेणे संतुष्ट चक्रपाणी |भक्तालागी सांभाळी ||४- ३-२१||
रामाचे गुणविशेष वर्णन करताना तर त्यांच्या प्रतिभे ळा विशेष बहर येतो. या एकाच श्लोकात रामाची ३ विशेषणे वापरली आहेत - १. रघूनायका २. वायुसुताचा महाराज ३. lokatrayacha नाथ .. श्री राम हे tyanche आराध्य दैवत hote!

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
समर्थांनी या श्लोकामध्ये मनाला "हीत माझें करावें" असे विनवले आहे...कोणते हीत? तर माझा चित्तात सदॆव श्रीरामाचे वास्तव्य असावे .....सतत त्याचेच चिंतन मनन आणि स्मरण चित्तामध्ये दॄढ असावे यासाठी समर्थ मनाला आळवित आहेत...मानवी मन असे आहे की ते ज्याचा ध्यास घेते त्याचाच सतत पाठपुरावा करते...ज्याचा ध्यास घेतला असेल तेच मन:पटलावर उमटत रहाते..या भौतिक जगातील मायानगरीत वावरताना सामान्य जीवाला भगवंताचे विस्मरण होउन या मायेचाच मोह पडतो....याचा अर्थ असा नव्हे की या सगळ्याकडे पाठ फ़िरवुन उपभोगशून्य आयुष्य जगावे...पण याचा आस्वाद घेताना विवेक जागा ठेवावा....धन, पॆसा ही गोष्ट अशी आहे की तो कीतीही मिळाला तरी त्याच्या प्राप्तीची लालसा संपत नाही....आज तर अशी परिस्थिती आहे की भरपूर पॆसा मिळवून त्याचा उपभोग घेण्यासाठी देखील माणसाला वेळ मिळत नाही...आणि सगळे मिळवून देखील असमाधान आणि अशांती यालाच त्याला जास्तित जास्त सामोरे जावे लागते...हे सर्व करत असताना त्याची "मी" पणाची भावना अधिक बळावलेली असते... हा अहंकारच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो.... समर्थ म्हणतात,
धन्य परमेश्वराची करणी| अनुमानेना अंतःकरणीं | उगीच अहंता पापिणी | वेढा लावी || दास.१५.८.३३||
अहंता सांडून विवरणें | कित्येक देवांचे करणें | पाहातां मनुष्याचें जिणें | थोडें आहे || दास.१५.८.३४||
अहंकाराने मनुष्य अल्पज्ञानावर "मी मोठा जाणता आहे" या भ्रमात वावरतो....समर्थ म्हणतात.....मोडा अहंतेचें पुंडावें | विवेकें देवास धुंडावें|। दास.१५.८.४०॥

॥जय जय रघुवीर समर्थ॥

suvarna lele said...

मना सज्जना हित माझे करावे असे समर्थ मनाला समजावतात .माणूस आपले हित कशात आहे असे मानतो ?धन ,धान्य ,संपत्तीत ! समर्थ यात हित आहे असे मानत नाहीत .तुकाराम महाराज म्हणतात :हित ते करावे देवाचे चिंतन |करूनिया मन एकविध ||तुकाराम महाराजांच्या म्हणण्यानुसार देवाचे चिंतन करण्यात हित आहे .व्यापारामध्ये ज्याप्रमाणे नफा झाला व्यापारामध्ये फायदा झाला असे आपण मानतो .त्याप्रमाणे नरदेह हे आपले भांडवल आहे असे मानले तर देवाचे चिंतन करणे हा आपला नफा असतो .म्हणून समर्थ म्हणतात :रघुनायकाला आपल्या मनामध्ये घट्ट धरून ठेव .राघव हाच तुझ्या चिंतनाचा विषय असू दे .विषयाची ओढ तू सोडून दे .
श्री प्रभूराम समर्थांचे आराध्य दैवत होते .त्यांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी ते वायुसुताचा म्हणजे मारुतीरायांचा दाखला देतात .मारुतीराय एक अद्भूत व्यक्तीमत्व आहे .वानर जातीत असून ही बुध्दिमान आहे ,संगीतापासून व्याकरणापर्यंत अनेक विषयात पांडित्य आहे ,चतुर आहे ,राजकारण धुरंधर आहे ,असामान्य शक्तीशाली ,राजकारणी आहे ,जितेंद्रिय आहे .असे अनेक गुण असलेला हनुमंत श्रीरामांपुढे नम्र आहे .तो स्वत :ला रामाचा दास म्हणवतो .असे श्रीराम स्वर्ग मृत्यू पाताळ ,त्रैलोक्याचे धनी आहेत.जनांचा उध्दार हे त्यांचे ब्रीद आहे .म्हणून हे मना लोकोध्दार करणा-या रामाचेच तू चिंतन कर .त्यालाच मनात घट्ट धरून ठेव .

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥

सर्व प्राप्त होउन देखील असमाधानीवृत्ती, इतरांविषयी द्वेष, मत्सर, ईर्षा, दुष्टबुध्दी यासर्वापासुन दूर राहून हे मना सतत श्रीरामाचा ध्यास चित्तामध्ये धर असे समर्थ आवर्जुन सांगतात....श्रीरामाचा ध्यास म्हणजे त्याच्यातील गुणांचा ध्यास....वाल्मिकी रामायणामध्ये प्रभुरामचंद्रांच्या या गुणांचा गौरव आला आहे....ज्याचे आचरण आपल्या कडुन व्हावे अशी समार्थांची अपेक्षा आहे.....त्यांच्या अनेक गुणांपॆकी एक म्हणजे ते सर्वांशी प्रेमाने बोलत कोणाचे मन दुखावले जाईल असे त्याचे बोलणे नसे...समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मना सर्व लोकांसी रे नीववावे....दुस-याचे दु:ख जाणुन घेउन त्याचे मन शांत होइल असे त्याचे बोलणे असे....गोंदवलेकर महाराज म्हणतात, "गोड सदा बोलावे । नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे । हाचि निरोप गुरूंचा । मन कोणाचे कधी न दुखवावे ।....सर्वांशी गोड बोलणे सहजपणे जमत नाही...पण रामचंद्रांना ते सहज साध्य झाले होते...अनेक गुणांपॆकी एक म्हणजे कोणी त्यांच्याकरीता काही केले तर ते त्याचा उल्लेख अनेकदा करीत पण स्वत: कोणासाठी त्यांनी काही केले तर त्याचा उल्लेख ते कदापी करीत नसत...मोठे पराक्रमी असून देखील आपल्या पराक्रमाचा अहंकार त्यांना कधी झाला नाही....दुस-याच्या मनाचा ठाव घेण्याची युक्ती भगवंताकडे आहे......रामचंद्रांच्या अनेक गुणांचे वर्णन वाल्मिकी रामायणात आढळते....अत्यंत नम्र, शांत आणि प्रेमळ श्रीराम दुष्टांचा संहार करणारे आहेत.....समर्थ जेव्हा रामाचे चिंतन करावयास सांगतात, रामचंद्रांना चित्ती धरावयास सांगतात तेव्हा त्यांच्यामधील यागुणांचा पाठपुरावा करावयास सांगतात....


॥जय जय रघुवीर समर्थ॥

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥

महाराज तो स्वामि वायुसुताचा ॥ जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥

पवनपुत्र हनुमान ज्यांचा दास आहे , तिन्ही लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्या श्रीरामाला सतत चित्तात धारण कर असे समर्थांचे मनाला सांगणे आहे....समर्थांनी स्वत:च्या जीवनात श्रीरामचंद्र आणि हनुमान यांची उपासना केली..या दोन दॆवतांवर त्यांची अत्यंतिक श्रध्दा होती...श्रीरामाचा लाडका दास हनुमंत समर्थांचे परमप्रिय दॆवत होते.....हनुमंतामधील अनेक गुण समर्थांमध्ये होते...एखाद्या दॆवाताची उपासना करावयाची म्हणजे त्याच्या गुणांचे चिंतन करून ते आपल्यामध्ये बाणावयाचे ही खरी उपासना समर्थांना प्राप्त झाली होती...श्रीरामभक्त हनुमान हे एक अष्टपॆलू व्यक्तिमत्त्व होते....निर्भय वक्तॄत्त्व, अफ़ाट स्मरणशक्ती, लाभलेला रामाचा दास अत्यंत निर्मळ अंत:करणाचा होता....चंचल वायुचा पुत्र हनुमंताला मनोवेगाने कोठेही पोहोचता येत असे....पण अत्यंत ज्ञानी असल्यामुळे स्थिरबुध्दी हा त्याचा विशेष....त्याच्या या गुणांमुळे त्याने श्रीरामाच्या मनात स्थान प्राप्त केले....हनुमंतानी जो स्वामी श्रीराम तिन्ही लोकांचा उद्धार करण्यास नेहमी कार्यरत असतो....अशा या रघुनायकाला दृढ़ चित्ती धरावे असे समर्थांचे सांगणे आहे


॥जय जय रघुवीर समर्थ॥

Gandhali said...

श्लोक 22
या श्लोकात मनाला उपदेश करताना समर्थ त्याचे सज्जन म्हणून कौतुक करतात आणि हे
मना तू सज्जन आहेस म्हणून माझे हित करणे तुला उचित आहे . पुष्कळ वेळा बुद्धी विवेक करू पाहते पण मन सन्मार्गाने जाऊ देत नाही .इंद्रियांची सुखे त्याला आकर्षक वाटतात आणि तेच खरे सुख असे वाटते . विषयोपभोगांच्या विपुलातेला तो समृद्धी समजतो. विषयांच्या अमर्याद उपभोगाला रसिकता हे नाव देतो आणि हेच योग्य हे ठरवण्याचे काम मन करते म्हणून समर्थ मनाला तू सज्जन आहेस ना मग माझे हित कर असे समजावतात.विषयांची ओढ सोड आणि श्री रामचंद्रापाशी माझे चित दृढ कर.मनाला समजावताना समर्थ श्रीमारुतीचे उदाहरण देतात कारण तो सुद्धा मनासारखा वेगवान मनोजव असा आहे . हा मारुती असामान्य बुद्धिमान आहे. तो पांडित्य चतुर,राजकारण धुरंधर असामान्य शक्तिशाली असून जितेंद्रिय आहे आणि असे हे उत्तुंग व्यक्तिमत्व रामचन्द्रापुढे नम्र आहे . रामाचा दास म्हणवून घेण्यात भूषण मानत आहे. या वरून हे मना श्रीरामांच्या श्रेष्टत्वाची कल्पना कर.एवढीच यांच्या थोरवीची मर्यादा नसून ते सर्व विश्वाचे, त्रिलोकाचे स्वामी आहेत .त्यांनी लोकांच्या उद्धाराचे व्रत घेतले आहे.त्यामुळे अशा अत्यंत श्रेष्ठ दैवताला धरून ठेवणे हिताचे आहे .

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar )...
समर्थरामदासजी कहते है कि हे मानव मन ! प्रत्येक प्राणि को ऐसा लगता है कि मेरा भला हो| अत: अपना भला करने के लिये हे मानव ! अपने मन में श्रीराम को द्रुढतापूर्वक बसाने का प्रयत्न करना चाहिए| सर्वलोक के स्वामी श्रीरामचन्द्रजी वायुपुत्र हुनुमान जी के राजा है|वही तीनो लोको के जनो का उद्धार करने वाले है| अत: मनुष्य को चाहिएये कि अपना उध्दार करने के लिये द्रुढता पूर्वक श्रीरामचन्द्र जी को अपने मे बसाये|.

lochan kate said...

[हिन्दी मे]
चाहे हर मन ,मेरा ही भला हो|
तो रघुनायक को चित्त में धर लो||
वो स्वामी है राजा वायुसूत का|
जन को त्रैलोक्यनाथ है उध्दरता||श्रीराम||२२||